०२० - २६६१०१०९४ / ०२० - २६६८०१७६
 जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,पुणे. |

महाराष्ट्र शासन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ,पुणे

आपले स्वागत करीत आहे.पुणे विषयी

पुणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळा व मुठा ह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले असून पुणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. नागरी सोयीसुविधा व विकासाबाबतीत पुणे हे महाराष्ट्रात मुंबईनंतर अग्रेसर आहे. या शहराच्या नावाचे Poona हे इंग्रजी स्पेलिंग सुमारे १५० वर्षे प्रचलित आहे. शिवाजीच्या आधीच्या काळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारतातील सातवे मोठे शहर व महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची ‘सांस्कृतिक राजधानी’; शहरात असलेल्या नामांकित शिक्षणसंस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. पुणे शहर उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा अग्रेसर आहे. मराठी ही शहरातील मुख्य भाषा आहे. आठव्या शतकात पुणे हे पुन्नक म्हणून ओळखले जात असे. शहराचा सर्वांत जुना पुरावा इ.स. ७५८चा आहे ज्यात त्या काळातील राष्ट्रकूट राजवटीचा उल्लेख आढळतो. मध्ययुगीन काळाचा अजून एक पुरावा म्हणजे जंगली महाराज रस्त्यावर असलेली पाताळेश्वर लेणी. ही लेणी आठव्या शतकातील आहेत. १७ व्या शतकापर्यंत हे शहर निजामशाही, आदिलशाही, मुघल अशा वेगवेगळ्या राजवटींच्या अंमलाखाली होते. सतराव्या शतकामध्ये शहाजीराजे भोसले यांना निजामशहाने पुण्याची जहागिरी दिली होती.. या जहागिरीमध्ये शहाजीच्या पत्‍नी जिजाबाई वास्तव्यास असताना इ.स. १६२७ मध्ये शिवनेरी किल्ल्यावरशिवाजीराजे भोसले यांचा जन्म झला. शिवाजी महाराजांनी आपल्या साथीदारांसह पुणे परिसरातील मुलखापासून सुरुवात करत मराठ्यांचे स्वराज्य स्थापले. या काळात पुण्यात शिवाजीमहाराजांचे वास्तव्य होते. पुढे पेशव्यांच्या काळात इ.स. १७४९ साली सातारा ही छत्रपतींची गादी असलेली राजधानी राहून पुणे मराठा साम्राज्याची प्रशासकीय राजधानी बनली. पेशव्यांच्या या काळात पुण्याची मोठी भरभराट झाली. इ.स. १८१८ पर्यंत पुण्यावर मराठ्यांचे राज्य होते. लाल महालशनिवारवाडा, विश्रामबाग वाडा हि पुण्यातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाची ठिकाणे आहेत. लाल महाल हे छत्रपति शिवाजी महाराजांचे, शनिवारवाडा हे थोरले बाजीराव पेशवे ते सवाई माधवराव पेशव्यांचे तर विश्रामबागवाडा दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे निवासस्थान आहे. पुणे हे महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. महाराष्ट्र राज्यात मुंबई महानगरानंतर पुणे सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. अजूनही पुणे शहराचा विकास वेगाने होत आहे. हे भारतातील बहुधा सर्वांत वेगाने विकसित होणारे शहर असावे. जगातील सर्वाधिक दुचाक्या बनावणारा बजाज ऑटो उद्योग पुण्यात आहे. टाटा मोटर्स (भारतातील सर्वाधिक प्रवासी वाहतूक आणि औद्योगिक वाहने बनावणारा उद्योग), कायनेटिक, डाइमलर-क्रायस्लर (मर्सिडिझ-बेंझ), फोर्स मोटर्स (बजाज टेंपो) हे उद्योग पुण्याच्या परिसरात स्थिरावले आहेत. पुण्यातील अभियांत्रिकी उद्योग – भारत फोर्ज (जगातील दुसरी सर्वांत मोठी फोर्जिंग कंपनी), कमिन्स, अल्फा लावल, सँडविक एशिया, थायसन क्रुप (बकाव वुल्फ), केएसबी पंप, फिनोलेक्स, ग्रीव्ह्‌ज इंडिया, फोर्ब्स मार्शल, थरमॅक्स इत्यादी. विद्युत व गृहोपयोगी वस्तूनिर्माते व्हर्लपूल आणि एल.जी. यांचे उत्पादन करणारे कारखाने, फ्रिटो-लेज, कोका-कोला यांचे अन्न प्रक्रिया उद्योग पुण्यात आहेतच, शिवाय अनेक मध्यम व लहान उद्योगही पुण्यात आहेत. आंतरराष्ट्रीय हवाईमार्गाने पुणे जोडले गेले आहे. त्यामुळे जवळच्या जिल्ह्यांतील अनेक उद्योग निर्यात करू लागले आहेत. पुण्यात माहिती-तंत्रज्ञान उद्योग विस्तारत आहे. हिंजवडीतील राजीव गांधी आय.टी पार्क, मगरपट्टा सायबरसिटी, तळवडे एम.आय.डी.सी. सॉफ्टवेअर पार्क, मॅरिसॉफ्ट आय.टी.पार्क (कल्याणीनगर), आय.सी.सी., इत्यादी आय.टी पार्क्समुळे इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी उद्योगाची भरभराट चालू आहे. महत्त्वाच्या भारतीय सॉफ्टवेअर कंपन्या- इन्फोसिस, टाटा, फ्ल्युएंट, क्सांसा, टी.सी.एस., टेक महिंद्रा, विप्रो, पटनी, सत्यम, कॉग्निझंट, आयफ्लेक्स,सायबेज, के.पी.आय.टी. कमिन्स, दिशा, पर्सिस्टंट सिस्टम्स, जॉमेट्रिक सॉफ्टवेअर, नीलसॉफ्ट व कॅनबे पुण्यात आहेत. महत्त्वाच्या बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपन्या- बी.एम.सी. सॉफ्टवेअर, एनव्हिडिया ग्राफिक्स, एच.एस.बी.सी. ग्लोबल टेक्नोलॉजीज, आय.बी.एम., रेड हॅट, सिमेन्स, ई.डी.एस., यूजीएस, कॉग्निझंट, सिमँटेक, सनगार्ड, व्हर्संट, झेन्सार टेक्नॉलॉजीज, टी-सिस्टिम आणि एसएएस, आयपीड्रम वगैरे. पुणे हे कॉल सेंटर किंवा बी.पी.ओ. उद्योगात देखील अग्रेसर आहे. कन्व्हरजिस, डब्ल्यू.एन.एस., इन्फोसिस, विप्रो, इएक्सएल, एमफेसिस या मोठ्या आऊटसोर्सिंग कंपन्या पुण्यात आहेत.

पुण्यातील काही मोठ्या कंपन्यांची मुख्यालये –
 • कमिन्स इंडिया लिमिटेड
 • नीलसॉफ्ट
 • पर्सिस्टंट सिस्टम्स
 • बँक ऑफ महाराष्ट्र
 • बजाज ऑटो लिमिटेड
कमिन्स इंडिया लिमिटेड, टेल्को/टाटा मोटर्स लिमिटेड, बजाज ऑटो लिमिटेड,फोर्स मोटर्स लिमिटेड, भारत फोर्ज लिमिटेड यासारखे उत्पादनक्षेत्रातील अनेक मोठे उद्योग येथे आहेत. १९९० च्या दशकात केपीआयटी कमिन्स, इन्फोसिस,टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस,विप्रो,सिमँटेक,आय.बी.एम.,कॉग्निझंट सिंटेल सारख्या प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपन्यांनी पुण्यात आपली केंद्रे उघडल्यापासून पुणे हे भारतातील एक प्रमुख माहितीतंत्रज्ञान उद्योगकेंद्र म्हणून नावारूपास आले आहे.
गणेशोत्सव – पुण्यातील गणेशोत्सव
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
इ.स.१८९४ मध्ये लोकमान्य टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. भाद्रपद (ऑगस्ट किंवा सप्टेंबर) महिन्यात येणाऱ्या या सणाच्या दहा दिवसांत अवघे पुणे शहर चैतन्यमय असते. देशपरदेशांतून लोक हा उत्सव पाहण्यासाठी पुण्यात येतात. जागोजागी लहान-मोठी गणेश मंडळे मंडप उभारून देखावे सजवतात. या पुण्याचा प्रसिद्ध गणेशोत्सवादरम्यान महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पुणे फेस्टिव्हल नामक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजते. या कार्यक्रमात संगीत, नृत्य, मैफिली, नाटक आणि क्रीडा हे प्रकार समाविष्ट असतात. दहा दिवस चालणारा हा सण गणेशविसर्जनाने समाप्त होतो. अनंत चतुर्दशीला सकाळी सुरू होणारी विसर्जन मिरवणूक पुढच्या दिवसाच्या पहाटेपर्यंत चालते. मिरवणुकीसाठी पहिल्या पाच गणपती मंडळांचे अग्रक्रम ठरलेले आहेत. कसबा गणपती-पुण्याचे ग्रामदैवत
 1. कसबा गणपती (हे पुण्याचे ग्रामदैवत आहे)
 2. तांबडी जोगेश्वरी गणपती
 3. गुरुजी तालीम गणपती
 4. तुळशीबाग गणपती
 5. केसरीवाडा गणपती (हे मंडळ टिळक पंचांगाप्रमाणे गणेशोत्सव साजरा करते.
पुण्यातील गणेशोत्सव मंडळे प्राणप्रतिष्ठा केलेली मूर्ती विसर्जित करून उत्सवमूर्ती परत नेतात. विसर्जन मिरवणुकीत ढोल, लेझीम अशी अनेक पथके असतात. अनेक शाळाही आपली पथके पाठवतात.
शिक्षण
पुणे विद्यापीठ
भारताच्या स्वातंत्र्यानंतर पुणे हे शिक्षण व संशोधन क्षेत्रात आपले वर्चस्व गाजवू लागले. पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) या संस्था स्थापन झाल्यामुळे पुण्याला हे शक्य झाले. फर्गसन महाविद्यालय, स.प.महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या संस्थांमुळे पुणे हे इ.स. १९०० पासुन नामांकित होतेच. पुण्याला जवाहरलाल नेहरू यांनी पूर्वेकडचे ऑक्सफर्ड असे संबोधले होते. पुण्यात अनेक नामांकित शिक्षण संस्था आहेत. येथे शिकायला देशातून व परदेशातूनही विद्यार्थी येत असतात. पुणेकरदेखील उच्च शिक्षण-संशोधनाबद्दल जागृत आहेत.
शहरात सर्व विषयातील उच्च शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध आहेत.
पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (NCL), आयुका (IIUCA), आघारकर संशोधन संस्था (ARI), सी-डॅक (C-DAC), राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्था (NIV), राष्ट्रीय कोषिका विज्ञान संस्था (NCCS), यशदा, भांडारकर संशोधन संस्था,द्राक्षे- राष्ट्रीय संशोधन केंद्र (NRC-Grapes), कांदा आणि लसुण- राष्ट्रीय संशोधन केंद्र (NRC- Onion and Garlic), राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (NARI),भारतीय विज्ञान आणि संशोधन संस्था (IISER), ईर्षा (IRSHA), वनस्पती सर्वेक्षण संस्था (BSI), सैन्यदलांचे मेडिकल कॉलेज (AFMC), भलीमोठी मीटरवेव्ह रेडिओ दुर्बीण (GMRT) सारख्या अनेक संस्था आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करत आहेत.
संशोधन संस्था
पुणे विद्यापीठाव्यतिरिक्त पुण्यात अनेक सुप्रसिद्ध व महत्त्वाच्या संशोधन संस्था आहेत. विद्यापीठाजवळ राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे तर विद्यापीठाच्या आवारात आयुका, नॅशनल सेंटर फॉर रेडियो पोलीस अॅस्ट्रोफिजिक्स व नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, राष्ट्रीय विमा अकादमी, केंद्रीय जल शक्ती संशोधन संस्था (Central Water and Power Research Station), उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, आघारकर संशोधन संस्था, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया व राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था या संस्थाही पुण्यात आहेत.
लष्कर शिक्षण व संशोधन संस्था
लष्करी शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था पुण्यात आहेत. श्री शिवाजी मराठा प्रिपरेटरी स्कूल(एस्‌‍एस्‌पीएम्‌‍एस), राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरींग, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंग वगैरे. तसेच लष्कराचे ए.एफ.एम.सी. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी भारतीय लष्कराच्या सेवेसाठी रूजू होतात. त्याचबरोबर आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (जुने नाव – डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलोजी), एक्स्प्लोझिव्ह रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन व आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलोजी या लष्कराशी संबंधित संशोधन करणाऱ्या संस्था देखील पुण्यात आहेत.
खेळ
क्रिकेट, कबड्डी, खोखो, कुस्ती हे पुण्यातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहेत. हॉकी, बॅडमिंटन, फुटबॉल, टेनिस, बॉक्सींग हे खेळ देखील प्रामुख्याने खेळले जातात. पुण्यात दरवर्षी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आयोजित केली जाते. पुण्यातील नेहरू स्टेडियमवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मुख्यालय आहे. येथे क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने खेळले जात होते, सध्या या ठीकाणी क्रीकेटचे प्रशीक्षण केंद्र सुरु आहे. डेक्कन जिमखान्यात अनेक खेळ खेळण्याची सुविधा आहे. महाळुंगे – बालेवाडी येथे विविध खेळांच्या आंतररार्ष्टीय दर्जाच्या क्रीडा सुविधा असलेले शिवछत्रपती क्रीडा संकुल असुन या ठिकाणी सन 1994 मध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा व सन २००८ मध्ये दुसरे यूथ कॉमनवेल्थ खेळ भरले होते. पुण्याजवळील गहुंजे येथे क्रिकेटचे महाराष्ट्र क्रिकेट चे आंतररार्ष्टीय दर्जाच्या व सुविधा असलेले अप्रतिम स्टेडियम आहे. त्याचे नाव MCA क्रिकेट स्टेडियम असे ठेवण्यात आले आहे.
मूळ पुण्यातील असलेले प्रसिद्ध खेळाडू – धनराज पिल्ले, विक्रम पिल्ले,‍ अजीत लाक्रा, रेखा भीडे – हॉकी, शांताराम जाधव, शकुंतला खटावकर, अशोक शींदे, कीशोरी शींदे, दिपीका जोसेफ, नीतीन घुले -कबड्डी, श्रीरंग इनामदार-खोखो, मारुती आडकर, काका पवार, राहुल आवारे- कुस्ती, हेमंत व हृषीकेश कानेटकर – क्रीकेट, राधिका तुळपुळे व नितीन कीर्तने –टेनिस, अंजली भागवत,‍ अनीसा सय्यद-शुटींग, बाळकृष्ण आकोटकर-ॲथलेटिक्स, गोपाल देवांग, मनोज पिंगळे-बक्सींग, हे आहेत.
महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे मुख्यालय पुणे येथे असुन अध्यक्ष श्री. अजित दादा पवार असुन महासचिव श्री बाळासाहेब लांडगे आहेत.
भौगोलिक स्थान, विस्तार व आकार
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार 17 अंश54′ ते 10 अंश 24′ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार 73 अंश 19′ ते 75 अंश 10′ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र 15.642 चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हयाच्या सीमेस उत्तरेस व पूर्वेस अहमदनगर जिल्हा, आग्नेयेस सोलापूर जिल्हा, दक्षिणेला सातारा जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा तसेच वायव्येला ठाणे जिल्हा आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे 5.10 टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे: : “घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.
पुण्याचे हवामान
पर्जन्यवितरण- पुणे जिल्हयाच्या भौगालिक रचनेनुसार पुणे जिल्हयात पर्जन्याचे वितरण समसमान नाही. जिल्हयाचा पश्चिम भाग जंगलांनी व्यापलेला असल्यामुळे या भागात पुर्वेकडील भागापेक्षा पर्जन्याचे प्रमाण जास्त आहे. येथील बराचसा पाऊस हा उन्हाळयात वाहणा-या नैऋत्य मान्सून वा-यांमुळे येतो व या महिन्यांमध्ये पर्जन्याचे प्रमाण सुमारे 87 टक्के असते. जुलै व ऑगस्ट या महिन्यात पर्जन्याची तीव्रता जास्त प्रमाणात असते. वेल्हा, मुळशी आणि मावळ या तालुक्यांमध्ये पर्जन्याचे प्रमाण जास्त असते. भोर, आंबेगाव, जुन्नर, खेड, हवेली व पुणे शहर या तालुक्यांमध्ये पर्जन्याचे प्रमाण मध्यम असते. शिरुर, दौंड, इंदापूर आणि बारामती हे तालुके कमी पर्जन्याचे, कोरडे व शुष्क भागात येतात. एप्रिल व मे या महिन्यांमध्ये पुणे जिल्हयात सर्वात जास्त तापमान असते. जिल्हयाचा पश्चिम भाग उदा.जुन्नर, आंबेगाव,खेड, मावळ, मुळशी आणि वेल्हा या तालुक्यांमध्ये तापमान थंड असते. परंतु जिल्हयाचा पुर्व भाग उदा. शिरुर, दौंड, बारामती आणि इंदापूर हे तालुके कोरडे व जास्त तापमान असणारे आहेत. डिसेंबर व जानेवारी या महिन्यांमध्ये तापमान 11 अंश सेल्सिअस पर्यंत खाली जाते. उन्हाळयामध्ये बाष्पीभवनाचे प्रमाण वाढल्यामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होते. या काळात आर्द्रतेच्या प्रमाणात विविधता आढळून येते. रात्रीच्या वेळी तापमान कमी असल्याने हवेतील पाण्याच्या वाफेचे द्रवात रुपांतर होते आणि दिवसा तापमान जास्त असते..

पुणे गॅलरी

Untitled Document
 • शिवापूर दर्गा

 • फर्ग्युसन कॉलेज

 • श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

 • सिंहगड किल्ला